पावसाचा नेम चुकला म्हणून नोंद घेता आली नाही ! कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर

Foto

औरंगाबाद : उष्णतेच्या झळांनी त्रस्त शहरवासीयांवर काल वरुणराजाने तासभर वर्षाव केला. गार- गार पावसाच्या वर्षवात शहरवासीय चिंब भिजत असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र साखर झोपेत होती. शहरातील सर्वच मंडळांना चिंब भिजवणाऱ्या पावसाची नोंद या यंत्रणेला घेता आली नाही. आश्चर्य म्हणजे पर्जन्यमापक यंत्रावर पाऊस पडला नाही, म्हणून नोंद घेता आली नाही, असे अजब- उत्तर नोंद घेणाऱ्या कारभाऱ्यांनी दिले. यावरून ही यंत्रणा किती गंभीर आहे हेच स्पष्ट होते.

 पाऊस हा सध्या सर्वात संवेदनशील विषय. सततच्या दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात पडलेला थोडा पाऊसही दिलासादायकच.  मात्र, याचे महत्व प्रशासकीय यंत्रणेला कळेल तरच नवल. आकाशात ढगांची गर्दी दिसली की लाखो डोळे एकटक बघत असताना प्रशासन मात्र झोपा घेते याचे वैषम्य वाटते. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील बदल सर्वसामान्य अचूक टिपत आहेत. काल औरंगाबादेत तासभर पावसाने धिंगाणा घातला. औरंगाबाद, उस्मानपुरा ,भावसिंगपुरा यासह ग्रामीण मधल्या चित्तेपिंपळगाव, चौका, कांचनवाडी, चिकलठाणा या सर्व मंडळात धो-धो पाऊस बरसला. मात्र, या पावसाची नोंद घेण्याचे साधे कामही करंट्या यंत्रणेने केले नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय ! अहो, चातकासारखी वाट पाहणारे सर्वसामान्य रस्त्यारस्त्यावर बेधुंदपणे पावसात चिंब भिजत  असताना यंत्रणा कुठे गायब होती ?  असा सवाल विचारला जात आहे. 

म्हणे, पर्जन्यमापक यंत्रावरच पाऊस पडला नाही…
जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पर्जन्य अहवालात केवळ उस्मानपुरा मंडळात १३ मिलिमीटर पावसाची नोंद आहे.इतर मंडळात पाऊस पडलाच नाही का ? असा सवाल जेव्हा पर्जन्यमापन यंत्रणेतील कर्मचाऱ्याला विचारला तेव्हा त्याचे उत्तर ऐकून भोवळ येण्याची वेळ आली. पाऊस पडला, मात्र पर्जन्यमापक यंत्रावरच पडला नाही ! असे उत्तर त्या बहाद्दराने दिले. आता डोक्यातच आणून घ्यायची वेळ आली आहे.

 मंडळात एक पर्जन्यमापक यंत्र प्रशिक्षणही झाले 
पावसाची नोंद घेण्याची जबाबदारी मंडळ अधिकार्‍यांची असते. एका मंडळात एक असे पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद घेण्यासाठी प्राधिकृत व्यक्ती नेमला जातो. सदर व्यक्ती दररोज थेट मंडळ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करतात. मंडळ अधिकारी तहसीलदार अन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाला रिपोर्ट सादर करतात. ही यंत्रणाच कोलमडून पडली आहे. पर्जन्यमापक यंत्र, प्राधिकृत व्यक्ती नोंद घेणारा कर्मचारी आणि मंडळ अधिकारी या सर्वांना मुळीच गांभीर्य नसल्याचे दिसते. त्यामुळे पर्जन्याची योग्य नोंद होत नाही. मग सारेच आराखडे चुकत जातात.

 जिल्हाधिकाऱ्यांनी करावी कारवाई 
पहिल्याच पावसाच्या नोंदी बाबत असा घोळ करणाऱ्या यंत्रणेवर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलायला हवा. जिल्ह्यातील पावसाची खडा न खडा आणि योग्य प्रकारे माहिती गोळा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यावर कृषी अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे. चुकीच्या नोंदी आणि चुकीचे रिपोर्ट विकासाची दिशा बदलतात, यात शंका नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker